संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या वतीने श्री गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त श्री साईआश्रम येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबीराचे उदघाटन संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आले आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता गरजु रुग्णांसाठी रक्तांची निकड लक्षात घेऊन रक्तदान हे सर्वश्रेष्ठ व पवित्र दान असल्याने श्री गुरुपौर्णिमा उत्सवाच्या मुहुर्तावर श्री साईआश्रम येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबीरात संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी रक्तदान करुन आपला सहभाग नोंदवला आहे.
या प्रसंगी संस्थानचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे,मुख्यलेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे,प्रशासकीय अधिकारी डॉ.आकाश किसवे,दिलीप उगले,उपअभियंता रघुनाथ आहेर आदी उपस्थित होते. तसेच या शिबीरात संस्थानचे मुख्यलेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे,जनसंपर्क अधिकारी मोहन यादव यांच्यासह शिर्डी ग्रामस्थ व संस्थानच्या विविध विभागातील कर्मचा-यांनी रक्तदान केले. रक्तदान करणा-या सर्व रक्तदात्यांना संस्थानच्या वतीने प्रमाणपत्र व ब्लड डोनरकार्ड देण्यात आले. सदर शिबीर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ.विजय नरोडे,वैद्यकीय अधिक्षीका डॉ.मैथिली पितांबरे व रुग्णालयाचे परिचारीका व परिचारक आणि कर्मचा-यांनी विशेष परिश्रम घेतले.
आज उत्सवाच्या मुख्य दिवशी पहाटे ०४.३० वाजता श्रींची काकड आरती झाली. पहाटे ०५.०० वाजता श्री साईसच्चरित या पवित्र ग्रंथाच्या अखंड पारायणाची समाप्ती झाली. या निमित्ताने श्री साईबाबांच्या प्रतिमेची व पोथीची व्दारकामाई मंदिरातून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीत संस्थानचे पुजारी उदय वाळुंजकर यांनी विणा, दिलीप सुलाखे यांनी पोथी तर विलास जोशी व चंद्रकांत गोरकर यांनी श्रींची प्रतिमा घेवून सहभाग घेतला. यावेळी मंदिर प्रमुख रमेश चौधरी उपस्थित होते.
आज सकाळी ०५.२० वाजता श्रींचे मंगलस्नान झाले. सकाळी ०६.०० वाजता श्री गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त पुजारी दिलीप सुलाखे यांनी सपत्नीक श्रींची पाद्यपुजा केली. सकाळी ११.०० वाजता लेंडीबागेत पुजारी बाळासाहेब जोशी यांच्या हस्ते श्री साईबाबा समाधी शताब्दी स्तंभाच्या ध्वजाचे विधीवत पुजन करुन ध्वज बदलण्यात आला. दुपारी १२.३० वाजता श्रींची माध्यान्ह आरती झाली. दुपारी ०४.०० ते सायं. ०६.०० यावेळेत कीर्तन झाले. सायंकाळी ०७.०० वाजता श्रींची धुपारती झाली. रात्रौ १०.३० श्रींची शेजारती झाली.
उद्या उत्सवाच्या सांगता दिनी दिनांक ०६ जुलै रोजी पहाटे ०४.३० वाजता श्रींची काकड आरती होईल. सकाळी ०५.४५ वाजता श्रींचे मंगलस्नान, सकाळी ०७.०० वाजता श्रींची पाद्यपुजा व गुरुस्थान मंदिरात रुद्राभिषेक होणार असून सकाळी १०.०० वाजता गोपालकाला कीर्तन व दहिहंडीचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी १२.१० वाजता श्रींची माध्यान्ह आरती होणार असून सायंकाळी ०७.०० वाजता श्रींची धुपारती होईल. रात्रौ १०.३० वाजता श्रींची शेजारती होईल.
Leave a Reply