माढा लोकसभा मतदारसंघातील महायुतीअंतर्गत तिढा अद्यापि कायम असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी आपल्या भूमिकेत बदल करीत माढय़ाच्या उमेदवारीवरील दावा कायम ठेवत प्रत्यक्ष प्रचारालाही प्रारंभ केल्याचे दिसून येते.
माढा लोकसभा मतदारसंघातील महायुतीअंतर्गत तिढा अद्यापि कायम असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी आपल्या भूमिकेत बदल करीत माढय़ाच्या उमेदवारीवरील दावा कायम ठेवत प्रत्यक्ष प्रचारालाही प्रारंभ केल्याचे दिसून येते. माढय़ातून लोकसभेवर निवडून गेल्यानंतर प्रत्येक जिल्हा परिषद गटात खासदार विकासनिधीतून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी इलेक्ट्रॉनिक्स वजनकाटे उभे करून साखरसम्राटांची काटामारी बंद करू, अशी ग्वाही खोत हे देत आहेत.
माढा लोकसभा मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत व राष्ट्रीय समाज पार्टीचे नेते महादेव जानकर या दोघांनी महायुतीतर्फे उमेदवारीचा परस्परविरोधी दावा केला आहे. खोत यांना शिवसेनेचे समर्थन असल्याचे सांगण्यात येते, तर जानकर यांना भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी शब्द दिल्याचे सांगण्यात आले आहे. खोत व जानकर यांनी माढय़ाच्या जागेसाठी प्रतिष्ठेचा प्रश्न केला आहे. यातच भर म्हणून रिपाइं नेते खासदार रामदास आठवले यांनीही ही जागा रिपाइंला सोडण्याचा आग्रह धरत त्यासाठी माजी मंत्री प्रतापसिंह मोहिते-पाटील यांना रिपाइंच्या तिकिटांवर निवडणूक लढविण्याचे आवतण दिले आहे.
त्यामुळे माढा लोकसभेची जागा महायुतीला डोकेदुखीची ठरू लागली आहे. या पाश्र्वभूमीवर महायुतीतील हा तिढा सामोपचाराने सुटण्यासाठी आयोजित बैठकीत जो तोडगा निघेल, तो सर्वाना मान्य करावा लागेल. यात ज्यांना उमेदवारी मिळेल, त्यास निवडून आणावे लागेल, अशी भूमिका खोत यांनी काही दिवसांपूर्वी स्पष्ट केली होती. महादेव जानकर यांना उमेदवारी मिळाली तर त्यांना निवडून आणण्यासाठी आपण रात्रंदिवस प्रचाराला लागू, अशीही ग्वाही खोत यांनी दिली होती.
तथापि, महायुतीत माढय़ावरील तोडगा अद्यापि निघाला नसतानाच आता खोत यांनी पुन्हा आपल्या भूमिकेत बदल करीत स्वत:चा प्रचार सुरू केल्याचे दिसून येते. करमाळा तालुक्यातील उमरड येथे आयोजिलेल्या शेतकरी मेळाव्यात खोत यांनी बोलताना आपला निवडणूक प्रचार असल्याचे सूचित केले. करमाळा तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे करमाळा तालुकाध्यक्ष महेश चिवटे, आदिनाथ साखर कारखान्याचे माजी संचालक प्रमोद बदे, सुभाष परदेशी, माढय़ाचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष शिवाजी पाटील आदींच्या उपस्थितीत आयोजिलेल्या या शेतकरी मेळाव्यात बोलताना खोत यांनी आपण दिलेल्या शेतकरी लढय़ाचा इतिहास कथन केला. आपण आतापर्यंत केलेल्या सेवेची उतराई म्हणून म्हणून माढा लोकसभा निवडणुकीत मते मागायला आलो असून, यात धनशक्तीचा पराभव करून जनशक्तीचा विजय होईल, असा दावाही त्यांनी केला.
पंढरपूर तालुक्यातील पिराची कुरोली व धोंडेवाडी आदी गावांमध्येही सदाभाऊ खोत यांनी प्रचार दौरा केला. आगामी लोकसभा निवडणुकीत माढय़ातून आपण निवडून गेलो आणि केंद्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडीला सत्ता मिळाली तर शेतीसाठी स्वतंत्रपणे अर्थसंकल्प मांडण्याची ग्वाही खोत यांनी दिली. या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक भोसले, पंढरपूर तालुका पंचायत समितीचे उपसभापती विष्णू बागल, संघटनेचे तालुकाध्यक्ष तानाजी बागल, स्वाभिमानी पक्षाचे तालुकाध्यक्ष नवनाथ माने, नितीन बागल आदी उपस्थित होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Leave a Reply