छत्रपती शिवरायांची निशाणी ढाल-तलवार होती. मात्र आत्ताच्या छत्रपतींची निशाणी काय तर बाटली आणि ग्लास! गोरगरिबांसाठी काम करा, शिवाजी महाराजांचा आदर्श घ्या, अशी टीका शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी जाहीर सभेत उदयनराजे भोसले यांच्यावर केली.
छत्रपती शिवरायांची निशाणी ढाल-तलवार होती. मात्र आत्ताच्या छत्रपतींची निशाणी काय तर बाटली आणि ग्लास! गोरगरिबांसाठी काम करा, शिवाजी महाराजांचा आदर्श घ्या, अशी टीका शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी सातारा येथे महायुतीच्या जाहीर सभेत उदयनराजे भोसले यांच्यावर केली. राष्ट्रवादी-काँग्रेसला गाडून टाका, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. महायुतीच्या संयोजनात यावेळी गडबड झाल्याने महायुतीतला वाद चव्हाटय़ावर आला. मात्र कदम यांनी सामंजस्याची भूमिका घेत वादावर पडदा टाकला.
सातारा येथील तालीम संघाच्या मदानावर महायुतीची जाहीर सभा कदम यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी नीलम गोऱ्हे, शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत, रिपाइंचे अशोक गायकवाड, भाजपच्या कांता नलावडे, रासपचे बजरंग खटके, भाजपचे जिल्हाध्यक्ष भारत पाटील तसेच शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना कदम म्हणाले, मुसलमानांच्या मतांसाठी आघाडीचे पक्ष लाचार झाले आहेत. अफजलखानाच्या कबरीजवळचे अतिक्रमण काढण्याचे न्यायालयाचे आदेश असताना अतिक्रमण काढले जात नाही. समितीचे भूत नाचवले जात आहे. पण मुसलमानांमधली गरिबी हटवण्यासाठी नक्की काय केले पाहिजे हे सांगितले जात नाही. आम्ही मुसलमानांच्या विरोधात नाही पण जे मुसलमान राष्ट्रीय विचारांचे नाहीत, पाकिस्तानला मदत करतात त्यांना या देशात राहाण्याचा अधिकार नाही, असे ते म्हणाले. आगामी विधानसभेत आम्ही विधानभवनावर झेंडा फडकवणार असे सांगून पाच पांडव एकत्र आले आहेत. कौरवांची सत्ता गाडल्याशिवाय रहाणार नाही, असेही कदम म्हणाले. मला सहा महिने गृहमंत्री करा अशी विनंती मी उद्धव ठाकरे यांना करणार आहे, या काळात कोंबडीचोर नारायण राणे यांच्यासह १६ घोटाळेबाज मंत्र्यांना तुरुंगात टाकल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असेही कदम म्हणाले.
गोऱ्हे यांनी सातारा जिल्हा आता पोरका झाला आहे. निराधार झाला आहे. पालकमंत्र्यांचा भाऊ बलात्कार करतो आणि असे असताना पालकमंत्र्यांची गच्छंती होत नाही तसेच खासदार ही याबाबत काही बोलत नाहीत. कारण उजेडात आंदोलन करायचे आणि अंधारात लोटांगण घालायचे असे त्यांचे वागणे आहे. सामान्यांना न्याय देणारा खासदार आता सातारा येथे पाहिजे, असे सांगून महिलांना सुरक्षितता द्यायची असेल तर महायुतीला निवडून आणा, असे आवाहन केले. सदाभाऊ खोत, शिवसेनेचे पुरुषोत्तम जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. दरम्यान, भोसले यांच्यावर टीका केली म्हणून त्यांच्या दोन कार्यकर्त्यांनी कदम यांच्या प्रतिमेचे दहन पोवईनाका येथे केले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Leave a Reply