काँग्रेस पक्षाकडून आपल्याला लोकसभेची उमेदवारी निश्चितपणे मिळेल असा विश्वास व्यक्त करत खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी रविवारी झालेल्या मेळाव्यात काँग्रेस पक्षाची सोबत अखेपर्यंत करण्याचा निर्धार बोलून दाखवला.
काँग्रेस पक्षाकडून आपल्याला लोकसभेची उमेदवारी निश्चितपणे मिळेल असा विश्वास व्यक्त करत खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी रविवारी झालेल्या मेळाव्यात काँग्रेस पक्षाची सोबत अखेपर्यंत करण्याचा निर्धार बोलून दाखवला. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने शरद पवार यांनी सुडाचे राजकारण चालवले असल्याचा आरोप त्यांनी केला. मेळाव्यात मंडलिक समर्थक कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळत नसेल तर महायुतीच्या उमेदवारीचा विचार करण्याची आग्रहपूर्वक भूमिका मांडली. कार्यकर्त्यांनी मांडलेल्या भूमिकेला थेट प्रतिसाद न देता मंडलिक यांनी काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळवण्यासाठी दबावाचे राजकारण चालवले असल्याचे दिसून आले.
लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर मंडलिक यांनी पक्षाकडे काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न चालवले आहेत, तर याच वेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी मंडलिक यांचे पुत्र, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय मंडलिक यांनी महायुतीची उमेदवारी स्वीकारावी असा सूर आळवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांची भावना लक्षात घेऊन आपली राजकीय भूमिका स्पष्ट करण्यासाठी रविवारी मंडलिक यांनी निवासस्थानी कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन केले होते. जिल्ह्यातील मंडलिक समर्थकांनी मेळाव्यास मोठी उपस्थिती लावतानाच उमेदवारीबाबत अन्याय होत असेल तर महायुतीचा पर्याय स्वीकारण्याची गरज व्यक्त केली. माजी दिनकर यादव, राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष लेमनराव निकम यांच्यासह डझनाहून अधिक वक्त्यांनी मंडलिक जी भूमिका स्वीकारतील त्याला आपले पाठबळ राहील, असे स्पष्टपणे सांगितले. मंडलिक समर्थकांनी काँग्रेस पक्षाकडून अन्याय होत असल्याचे कथन करीत पक्षावर टीकेची झोड उठवली. तर शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांनी देशाची प्रगती काँग्रेस पक्षामुळे झाली असल्याचे नमूद करून पक्षावर अनाठायी टीका करणे अयोग्य असल्याचे सांगितले.
सुमारे तीन तासाहून अधिक काळ कार्यकर्त्यांनी मांडलेल्या विविधांगी भूमिकांचा उल्लेख करून मंडलिक यांनी छोटेखानी भाषणात आपल्या पुढील राजकीय वाटचालीचे निर्देश केले. ते म्हणाले, काँग्रेस पक्ष माझ्या बाजूने निर्णय घेईल याचा मला अजूनही विश्वास वाटतो. कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेल्या भावना लक्षात घेऊन माझी भूमिका दोन दिवसांत स्पष्ट करणार आहे. देशात काँग्रेस पक्ष अडचणीत असल्याचा फायदा घेऊन शरद पवार यांनी सुडाचे राजकारण चालवले असून मला उमेदवारी मिळू नये असा त्यांचा प्रयत्न आहे. विरोधकांनी कुटिल राजकारण चालवले तरी काँग्रेस पक्ष मात्र मला निश्चितपणे लोकसभेची उमेदवारी देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Leave a Reply