कूपवाड येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून फरारी झालेल्या आरोपीने बोकड चोरीस अडथळा ठरणा-या दोन शेतक-यांचा खून केला असल्याची माहिती उघडकीस आली असून दोघा आरोपींना सांगली पोलिसांनी सोमवारी अटक केली.
कूपवाड येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून फरारी झालेल्या आरोपीने बोकड चोरीस अडथळा ठरणा-या दोन शेतक-यांचा खून केला असल्याची माहिती उघडकीस आली असून दोघा आरोपींना सांगली पोलिसांनी सोमवारी अटक केली. शाळेचा अभ्यास कर म्हणून पालकांकडून सातत्याने होणारा त्रास वाचविण्यासाठी घराबाहेर पडलेल्या या आरोपीने पाच वर्षांपासून कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात दुचाकी व बोकड चोरीचे अनेक गुन्हे केले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.
कूपवाड येथे मोबाइलवर सातत्याने बोलणा-या अल्पवयीन मुलगी पालक रागविल्यानंतर दि. १९ फेब्रुवारी रोजी घराबाहेर पडली होती. ती एकटी असल्याचे पाहून विजय मधुकर गुरव (२१, रा. शिरगाव, जि. कोल्हापूर) व रतन दत्ता माने (२०, रा. वडर कॉलनी, सांगली) या दोघांनी पोलीस असल्याची बतावणी करून जबदरस्तीने गाडीवर बसवून कूपवाड येथील एका खोलीत नेले होते. त्या ठिकाणी आरोपी विजय गुरव याने बलात्कार करून जिवे मारण्याची धमकी देऊन पोबारा केला होता.
औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक संजय मेंढे, बाबा पटेल, नंदू पवार, मनीषा भडेकर, सुमेधा कांबळे आदी पोलिसांनी संशयित आरोपीच्या सांगलीतील मत्रिणीची माहिती मिळविली. या मत्रिणीशी आरोपीचा संपर्क असल्याने आज तो अलगद पोलिसांच्या जाळ्यात अडकला. त्याने कसबे डिग्रज येथे पांडुरंग जाधव याचा ३० जानेवारी रोजी बोकडाची चोरी करीत असताना डोक्यात दगड घालून खून केला होता. या शिवाय अंत्री (ता. शिराळा) येथेही २०१० मध्ये एका वृद्ध शेतक-याला बोकड चोरीस विरोधी करीत असताना काठीने मारहाण करून गंभीर जखमी केले होते. त्यात त्याचा मृत्यू झाला होता. या दोन्ही खुनांची कबुली आरोपीने दिली असल्याचे श्री. मेंढे यांनी सांगितले.
या आरोपींनी पोलीस अशी लिहिलेली दुचाकी (एम एच १० बीएफ ४८९३) गुन्ह्यासाठी वापरली होती. तिही पोलिसांनी हस्तगत केली आहे. विजय पाटील असे खोटे नाव सांगून आपण पोलीस असल्याची बतावणी करून तो रानातील बोकड चोरून जत, शाहूवाडी, कवठेमहांकाळ आदी बाजारात विक्री करीत होता. त्यांनी मालगाव, नांद्रे, शिराळा, कसबे डिग्रज, तुंग आदी गावातून बोकडांची व चार मोटरसायकलची चोरी केली असल्याची माहिती तपासात उघड झाली आहे. सांगली येथील शाळकरी तरुणीबरोबर त्याचे संबंध होते. तिच्याशी त्याने पोलीस असल्याचे सांगत नाते निर्माण केले होते. तिच्याकडून मिळालेल्या माहितीवरून आज दोघांना अटक करण्यात आली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Leave a Reply