प्रवरा पात्रात धरणातून पाणी सोडल्याने अखेर शहरातील गणेश विसर्जन निर्विघ्नपणे पार पडले.
प्रवरा पात्रात धरणातून पाणी सोडल्याने अखेर शहरातील गणेश विसर्जन निर्विघ्नपणे पार पडले. मात्र नदीतील डोहात बुडून अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या प्रशांत कोकाटे (वय-२१) या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने विसर्जनाच्या आनंदात विरजण पडले. अचानक पाणी सोडण्याचा निर्णय झाल्याने ऐनवेळी मिरवणुकीची तयारी करताना कार्यकर्त्यांची मोठी कसरत झाली.
जोपर्यंत नदीला पाणी येत नाही तोवर विसर्जन न करण्याच्या निर्णय सर्वपक्षीय गणेशोत्सव मंडळांनी घेतला होता. त्यामुळे संगमनेरचे गणेश विसर्जन अनंत चतुर्दशीला होणार नसल्याचे निश्चित झाले होते. मात्र त्यानंतर वेगाने सूत्रे फिरली आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या आदेशावरून शनिवारी रात्री बाराच्या सुमारास निळवंडे धरणातून पाणी सोडण्यात आले. रविवारी सकाळपर्यंत अनेकांना पाणी सोडण्यात आल्याबाबत कल्पना नव्हती. अखेर पाणी सेाडल्याची खात्री पटल्यानंतर सर्वाची एकच धावपळ उडाली. दरम्यान पाणी सोडणार नसल्याची खात्री झालेल्या नगरपालिकेने किमान घरगुती गणपतींचे विसर्जन करता यावे यासाठी शनिवारी रात्री जेसीबी लाऊन नदीपीत्रात मोठमोठे खड्डे खोदले. पालिकेचा लाखो रूपयांचा खर्च प्रवरेला आलेल्या पाण्यात वाहून गेला.
शनिवारी मध्यरात्री सोडलेले पाणी रविवारी दुपारी चार वाजता शहराच्या हद्दीत पोहोचले. तोवर वाट पाहून थकलेल्या छोटय़ा-छोटय़ा मंडळांनी व घरगुती गणरायाचे पात्रात असलेल्या डोहात विसर्जन करून घेतले. दरम्यान आमदार बाळासाहेब थोरात, नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांच्या हस्ते सकाळी मानाच्या गणपतींची विधिवत पूजा करून विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला. त्यानंतर एकेक करत सगळे गणपती विसर्जन मार्गावर दाखल झाले. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. यावर्षी प्रथमच डीजेच्या कर्णकर्कश आवाजापासून संगमनेरकरांना मुक्ती मिळाली. गुलालाचाही वापर झाली नाही. रात्री दहानंतर एकेक गणपती नदीपात्राकडे मार्गस्थ होऊन मिरवणुकीची सांगता झाली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Leave a Reply