‘रेमडेसिविर‘चा काळाबाजार; आणखी दोन गुन्हे दाखल
नगर : करोनाग्रस्तांच्या उपचारासाठी आवश्यक असलेले रेमडेसिविर इंजेक्शनचे वितरण जिल्हा प्रशासनाच्या नियंत्रणाखालील सुरू असले तरी त्याचा काळाबाजार थांबलेला नाही. जिल्हा प्रशासनाने वितरित केलेले इंजेक्शनच रुग्णालयातील कर्मचारी, शिकाऊ डॉक्टरांमार्फत काळ्याबाजारात विकले जात असल्याचे पोलीस तपासात आढळत आहे. दरम्यान रेमडेसिविरची काळ्याबाजारात विक्री केल्याच्या आरोपावरून नगर शहरातील तोफखाना व एमआयडीसी पोलिसांकडे दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई पोलिसांच्या गुन्हे शाखेने केली.
गुन्हे शाखेच्या दोन स्वतंत्र कारवायांमध्ये दोन टोळ्या रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करत असल्याचे आढळले आहे. तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यत हेमंत दत्तात्रय कोहक (२१, सनफार्मा शाळेजवळ, बोल्हेगाव, नगर) याला अटक करण्यात आली आहे तर महेश दशरथ मते (रा. बरबडे वस्ती, तपोवन रस्ता, नगर), प्रदीप मारुती मगर व अमर शिंदे (दोघे रा. तागडवस्ती, नगर) या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यत भागवत मधुकर बुधवंत (२०, आदर्श कॉलनी, बोल्हेगाव) व आदित्य बाबासाहेब म्हस्के (२१, माताजी नगर, एमआयडीसी) या दोघांना अटक करण्यात आली आहे. बुधवंत व म्हस्के हे दोघे काकासाहेब म्हस्के वैद्यकीय महाविद्यालयात शिकाऊ डॉक्टर म्हणून काम करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना रेमडेसिविर इंजेक्शन काळ्याबाजारात विकली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सहायक निरीक्षक सोमनाथ दिवटे व मिथुन घुगे यांच्या नेतृत्वाखाली पथके तैनात करण्यात आली. प्राप्त झालेल्या एका मोबाइल क्रमांकावर बनावट ग्राहकामार्फत संपर्क करून रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी करण्यात आली. हा क्रमांक हेमंत कोहक याचा होता. त्याने बालिकाश्रम रस्त्यावरील तारडे रुग्णालयाजवळ इंजेक्शन घेण्यासाठी बोलावले व २७ हजार रुपये किमतीला इंजेक्शन उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर पथकाने त्याला अटक केली.
त्याच्याकडून एक पॉलिफार्मा कंपनीचे इंजेक्शन, स्कॉर्पिओ (एमएच १४ डीटी ९३२३) व मोबाइल असा एकूण ७ लाख १२ हजार ४०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. कोहकला महेश मते याच्याकडून इंजेक्शन उपलब्ध झाले होते तर मते याला मगर व शिंदेकडून ते मिळाले होते. या टोळीचा प्रमुख सूत्रधार मगर आहे. मते, मगर व शिंदे हे तिघे फरार आहेत.
दोन इंजेक्शन जप्त
दुसऱ्या एका घटनेत गुन्हे शाखेने पुन्हा बनावट ग्राहकामार्फत भागवत बुधवंत याच्याशी संपर्क केला. त्याने ३२ हजार रुपयांना इंजेक्शन उपलब्ध करण्याची तयारी दर्शवली त्यानंतर पथकाने बुधवंत व म्हस्के या दोघांकडून सनफार्मा व सिप्ला कंपनीचे दोन इंजेक्शन जप्त केले. या दोघांना ते अंकित कालिका मौर्य (रा. गुरुकृपा कॉलनी एमआयडीसी) याच्याकडून ते उपलब्ध झाले होते. मौर्य मौल्यवान फरार आहे.
इंजेक्शनची विल्हेवाट काळ्याबाजारात
यापूर्वीही भिंगार कॅम्प,
कोतवाली व तोफखाना पोलीस ठाण्यात ‘रेमडेसिविर‘ काळ्याबाजारात विकले जातानाचे गुन्हे दाखल झाले आहेत. या गुन्ह्यंमध्ये रुग्णालयाचे कर्मचारीच त्यात सहभागी असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार ‘रेमडेसिविर’ चा वापर सुरू असलेला रुग्ण मृत्यू पावल्यास उर्वरित इंजेक्शनची विल्हेवाट रुग्णालयातील कर्मचारी काळ्याबाजारात विकून करत असल्याचे आढळले आहे.
The post प्रशिक्षणार्थी डॉक्टर व कर्मचाऱ्यांना अटक appeared first on Loksatta.
Leave a Reply