नगर : वाळू वाहतूकदाराला १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणारे शेवगावचे पोलीस उपअधीक्षकांच्या पथकातील तीन कर्मचाऱ्यांना आज, मंगळवारी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी निलंबित केले आहे. वसंत कान्हू फुलमाळी (पाथर्डी), कैलास नारायण पवार (पाथर्डी) व संदीप वसंत चव्हाण (शेवगाव) अशी निलंबित केलेल्या तिघा कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी शेवगावचे पोलीस उपअधीक्षक सुदर्शन मुंडे यांनी विशेष पथक स्थापन केले होते. त्यामध्ये पाथर्डी व शेवगाव पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांचा समावेश केला होता. काही दिवसांपूर्वी पथकाने वाळू वाहतूकदाराची ट्रक पकडला. हा वाहतूकदार सरकारी परवान्याची वाळू वाहतूक करतो. त्याचा पकडलेली ट्रक सोडण्यासाठी व वाळू वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी या कर्मचाऱ्यांनी १५ हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने केलेल्या तक्रारीनंतर नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पंचांसमक्ष या मागणीची पडताळणी केली. परंतु लाच स्वीकारण्यापूर्वीच हे तिघे फरार झाले होते. परंतु त्यांनी लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाल्याने तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आज तिघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
The post तीन लाचखोर पोलीस कर्मचारी निलंबित appeared first on Loksatta.
Leave a Reply