नगर : महाराष्ट्रातील राज्य सरकारने केंद्र सरकारची सलोख्याचे वातावरण ठेवले तर करोनाग्रस्तांवरील उपचारासाठी जास्त मदत मिळेल, असा दावा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला.
विरोधी पक्षनेते दरेकर आज, मंगळवारी नगरमध्ये होते. करोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांसमवेतच्या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना हा दावा केला.
राज्य सरकारने प्रत्येक वेळेला स्वत:चे अपयश झाकण्यासाठी कोणतीही गोष्ट केंद्र सरकारवर ढकलायची हे बरोबर नाही. १ हजार ७५० मे. टन प्राणवायू साठा, सर्वात जास्त म्हणजे ४ लाख ६५ हजार रेमडेसिविर महाराष्ट्राला मिळत आहेत. याशिवाय महाराष्ट्राने देशात सर्वात जास्त लसीकरण केले आहे कारण लस केंद्र सरकारने उपलब्ध केल्यामुळेच ते शक्य झाले. असे असतानाही केंद्र सरकारवर टीका करणे योग्य नाही. केंद्र सरकार काही महाराष्ट्रावर मेहरबानी करत नाही तर कर्तव्य म्हणूनच मदत करत आहे. परंतु केंद्र सरकारशी महाराष्ट्राने सलोख्याचे वातावरण ठेवले ठेवले तर अधिक मदत उपलब्ध होईल. राज्य सरकार आपल्या यंत्रणा कमी पडतात म्हणून उठसूट केंद्राकडे बोट दाखवणे योग्य नाही. असा टोला दरेकर यांनी लगावला.
सध्याच्या परिस्थितीतही केंद्र व राज्य सरकार परस्परांवर टीका करत आहेत, राजकारण करत आहेत, याकडे लक्ष वेधले असता दरेकर म्हणाले की, सध्याच्या परिस्थितीत राजकारण करणे दुर्दैवी आहे. अशा संकटकाळात कोणीही राजकारण करू नये. ना राज्य सरकारने ना आम्ही. परंतु महाराष्ट्रातील सरकार प्रत्येक वेळेला अपयश झाकण्यासाठी केंद्रावर जबाबदारी ढकलत आहे, असा दावा त्यांनी केला. अभिनेत्री कंगना राणावत हिचे अकाऊंट ट्विटरने बंद केले याकडे लक्ष वेधले असता दरेकर यांनी आपल्याला या विषयी अधिक माहिती नाही असे सांगत बोलण्यास नकार दिला.
नागरिकांचा संताप व्यक्त
पंढरपूर—मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील निकाल म्हणजे राज्य सरकारबद्दल मतदारांनी प्रातिनिधिक स्वरूपात व्यक्त केलेला संताप आहे. महाराष्ट्रात असे अपवादात्मक घडले आहे की एखाद्या घराण्यातील लोकप्रतिनिधी जातो तेथे त्याच घराण्याशिवाय दुसरा कोणी निवडून येत नाही. त्यामुळे तेथे भालके यांच्याविषयी भावनिक वातावरण निर्माण न होता विकास व सद्याच्या परिस्थितीबद्दल राज्य सरकारच्या विरोधातील नकारात्मक मते नागरिकांनी व्यक्त केली, अशी प्रतिक्रियाही विरोधी पक्षनेते दरेकर यांनी व्यक्त केली.
The post केंद्राशी सलोखा ठेवला तर महाराष्ट्राला अधिक मदत- दरेकर appeared first on Loksatta.
Leave a Reply