विरोधी पक्षनेत्यांना अमान्य
परिस्थिती नियंत्रणाखाली असल्याचा दावा
नगर : शहराबरोबरच जिल्ह्यतही करोनाग्रस्तावांवर उपचारासाठी रुग्णालयात खाटा उपलब्ध होत नाहीत, प्राणवायू, रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे, करोनाबळींची संख्याही वाढली आहे. मात्र जिल्ह्यतील हे वास्तव विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना मान्य नाही. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीवर, त्यांनी जिल्ह्यतील परिस्थिती बऱ्यापैकी नियंत्रणाखाली आहे असे सांगत समाधान व्यक्त केले. त्यांच्या या वक्तव्याने त्यांच्याच पक्षाचे, भाजपचे पदाधिकारी अस्वस्थ झाल्याचे जाणवले.
जिल्ह्यतील करोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आज, मंगळवारी नगरमध्ये होते. त्यांनी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी आ. बबनराव पाचपुते, माजी मंत्री शिवाजी कर्डिले, महापौर बाबासाहेब वाकळे, शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, अॅड. अभय आगरकर आदी उपस्थित होते. बैठकीनंतर दरेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
दरेकर म्हणाले की, जिल्हा प्रशासनाची अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन परिस्थिती समजून घेतली. रुग्णालयातील खाटांची उपलब्धता, आयसीयू बेड, प्राणवायू व रेमडेसिविर साठा याची माहिती घेतल्यानंतर जिल्ह्यतील परिस्थिती नियंत्रणाखाली असल्याचे दिसते. प्राणवायूच्या साठय़ामध्ये केवळ १० मे. टनाची तफावत आहे. त्यामुळे येथे फार उणीव आहे, असेच चित्र दिसत नाही. आम्हीसुद्धा सरकार व कंपन्यांशी चर्चा करून जास्तीत जास्त साठा नगरला उपलब्ध होण्यासाठी काळजी घेत आहोत.
दरेकर यांनी जिल्ह्यतील परिस्थिती बऱ्यापैकी नियंत्रणाखाली आहे, असे वक्तव्य केल्यानंतर त्यांची ही माहिती परिस्थितीशी विसंगत असल्याकडे लक्ष वेधले असता दरेकर म्हणाले की, मी जरी प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार बोलत असलो तरी माझ्या समवेत आमदार पाचपुते शिवाजी कर्डिले हे लोकप्रतिनिधी होते. त्यांनीही परिस्थिती नियंत्रणाखाली असल्याचे सांगितले.
जिल्हा रुग्णालयात २८२ खाटांचे क्षमता असली तरी तेथे ५०० हून अधिक रुग्णांवर तेथे उपचार सुरू आहेत. दिल्ली सरकारी रुग्णालयाकडे यंत्रणा उपलब्ध आहे. खासगी रुग्णालयांना रेमडेसिविर, प्राणवायूचा साठा पुरवताना जिल्हा प्रशासनावर ताण आला आहे. पत्रकारांकडे वेगळी काही माहिती असल्यास ती आपणाला सांगावी, आपण राज्य सरकारला व जिल्हा प्रशासनाला त्यासंदर्भात जाब विचारू, अशीही सारवासारव दरेकर यांनी केली.
भाजपचे पदाधिकारीही चकित
जिल्हा प्रशासनाकडून आढावा घेताना विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते दरेकर यांच्यासमवेत आ. बबनराव पाचपुते, माजी मंत्री शिवाजी कर्डिले, महापौर वाकळे यांच्यासह नगर शहर व जिल्ह्यतील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी जिल्हा प्रशासनाला निवेदन देऊन उपचार सुविधांमध्ये मोठय़ा प्रमाणावर तुटवडा जाणवत असल्याचे निवेदन देत आंदोलनाचा इशाराही दिला होता. मात्र तरीही दरेकर यांनी जिल्ह्यतील परिस्थिती नियंत्रणाखाली असल्याचा उल्लेख केल्याबद्दल पक्षाचे कार्यकर्ते आश्चर्य व्यक्त करीत आहेत. आम्ही वेळोवेळी पक्षाच्या वरिष्ठांकडे, प्रदेश कार्यालयाकडे जिल्ह्यतील माहिती कळवत असतो, त्याकडे दुर्लक्ष झालेले दिसते, अशी टिप्पणी एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केली.
The post जिल्ह्यतील ‘करोना’चे वास्तव appeared first on Loksatta.
Leave a Reply