जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
मकाचे दर घसरले असतांना शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी शासकीय दराने शासनाने मका खरेदी करण्यास सुरुवात केली होती मात्र मका खरेदी करण्याची मुदत संपल्यामुळे अजूनही बहुतांश शेतकऱ्यांकडे मका शिल्लक असून ही मका शासकीय दराने खरेदी केली जावी यासाठी मका खरेदी करण्यासाठी मुदतवाढ द्यावी अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी अन्न नागरी पुरवठा मंत्री ना.छगन भुजबळ व सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे.
केंद्र शासनाची आधारभूत किंमत खरेदी योजना ही शेतकर्यांच्या हितासाठी जाहीर केलेली आहे.या योजनेअंतर्गत केंद्र शासन निरनिराळया पिकांच्या किमान आधारभूत किंमती जाहिर करते व याशिवाय आधारभूत किंमतीच्या लाभ होण्याचे दृष्टीने,शेतकर्यांना हमी भावापेक्षा कमी किंमतीने धान्य विकावे लागू नये म्हणून शासनातर्फे धान्याची (एफ.ए. क्यू ) खरेदी करण्यात येते.
दिलेल्या निवेदनात आ.काळे यानी असे म्हटले आहे की,”महाराष्ट्र राज्यात केंद्र शासनाची “नोडल एजन्सी” म्हणून भारतीय अन्न महामंडळ काम पहाते.तर भारतीय अन्न महामंडळाच्या वतीने राज्य शासनाकडून महाराष्ट्र राज्यात आधारभूत किंमत खरेदी योजनेची शासनमान्य अभिकर्ता संस्थेमार्फत अंमलबजावणी करण्यात येते.
या वर्षी समाधानकारक पर्जन्यमान झाल्यामुळे सर्वच पिकांचे उत्पादन वाढले आहे.यामध्ये मका पिकाचा देखील समावेश असून मकाचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न झाले आहे.मात्र मकाचे बाजारभाव पडल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडले असतांना शासकीय दराने शासनाने मका खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता.त्यामुळे शेतकऱ्यांना मकाचे योग्य दर मिळत होते.मात्र मका खरेदी करण्याची मुदत संपुष्टात आल्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून खरेदी करण्यात येत असलेली मका खरेदी बंद करण्यात आली आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या मका विक्री करणे अद्याप बाकी आहे त्या शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे त्यासाठी मका खरेदी करण्यासाठी मुदतवाढ दयावी अशी मागणी अशी मागणी आ. काळे यांनी अन्न नागरी पुरवठा मंत्री भुजबळ व सहकार मंत्री पाटील यांना दिलेल्या निवेदनात शेवटी केली आहे.
Leave a Reply