जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव ( प्रतिनिधी )
अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात
दररोज होत असलेल्या पावसामुळे सर्वच पिके भूईसपाट झाल्याने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावून गेला आहे. सरकारी यंत्रणेकडून नुकसानीचे पंचनामे सुरु असले तरी या प्रक्रियेत वेळ घालविण्यापेक्षा शासनाने अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळवून द्यावी अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांनी मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री व महसूल मंत्री यांना पाठविलेल्या पत्राद्वारे नुकतीच केली आहे.
वर्तमान कालखंडात दररोज पाऊस होत असल्याने शेतातील उभी पिके,ऊस,मका, कपाशी,भईमूग,बाजरी,तूर,कांदा रोपे तसेच भाजीपाला पिकांसह फळबागांचे देखील प्रचंड नुकसान झालेले आहे-राजेश परजणे
कोपरगांव तालुक्यात जवळजवळ सर्वच गावांना वादळी पावसाचा मोठा तडाखा बसलेला आहे. दररोज पाऊस होत असल्याने शेतातील उभी पिके ऊस, मका, कपाशी, भईमूग,बाजरी,तूर,कांदा रोपे तसेच भाजीपाला पिकांसह फळबागांचे देखील प्रचंड नुकसान झालेले आहे. सततच्या पाण्यामुळे बरीच पिके अक्षरशः सडून गेली आहेत.
एकतर यंदा गेल्या सहा-सात महिन्यांपासून कोरोना संसर्गाने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करण्याची वेळ आलेली असतानाच दररोजच्या पावसाने शेतकऱ्यांना आणखीनच संकटात टाकले आहे.वर्तमानात शेतकरी वर्ग मोठ्या विवंचनेत सापडलेला असल्याने शासनाने तातडीने आर्थिक मदत करुन हातभार लावणे गरजेचे आहे.
शासनाने पंचनामे करण्यात वेळ घालण्यापेक्षा अधिसूचना जाहीर करुन संकटात सापडलेल्या
शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी अशीही मागणी श्री परजणे यांनी शेवटी केली आहे.