जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतीनिधी)
महाराष्ट्र शासनाची ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहीम सुरेगाव येथे यशस्वीपणे राबवून त्या मोहिमेचा लाभ प्रत्येक घराला आणि घरातील प्रत्येक माणसाला मिळावा या साठी सुरेगाव मधील आरोग्य विभाग,सरपंच,ग्रामसेवक यांची मार्गदर्शन बैठक आज पार पाडून प्रत्यक्षात मोहिमेचा शुभारंभ सुरेगाव चे सरपंच शशिकांत वाबळे यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात करण्यात आला आहे.
राज्यात करोनाने उग्र रुप धारण केले आहे. सारा देश आज करोनाग्रस्त महाराष्ट्राचे आता काय होणार या चिंतेत आहे. तब्बल ११ लाख ६७ हजार करोना रुग्णांची संख्या झाली असून रोजच्या रोज २० ते २४ हजार नवीन रुग्ण सापडत आहेत. गेले चार दिवस रोज ४०० हून अधिक करोना रुग्णांचा मृत्यू होत असून करोना रुग्णांच्या संपर्कातील २० लोकांना शोधण्याचे कामही कोणत्याही जिल्ह्यात योग्यप्रकारे होत नाही. यातून करोनाचा संसर्ग वेगाने पसरत चालला असून मास्क व सोशल डिस्टसिंगचे पालन लोकांकडून केले जात नाही. करोनाला आता सहा महिने होत असल्याने शासकीय तसेच आरोग्य यंत्रणेत ही एक शैथिल्य आले असून या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आणलेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या योजनेचे महत्व वादातीत आहे.
यावेळी संबंधितांना या मोहिमेच्या विषयी माहिती देण्यात आली.यावेळी सुरेगाव चे सरपंच शशिकांत वाबळे यांनी बैठकीत मार्गदर्शन करताना सांगितले की, कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी जनतेच्या सक्रिय सहभागाची अत्यंत आवश्यकता आहे.महाराष्ट्र कोविडमुक्त करण्यासाठी एकत्र येऊन लढण्याच्या उद्देशाने ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ ही मोहीम राबवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.या मोहिमेंतर्गत विविध ठिकाणी प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी, गंभीर आजार असल्यास उपचार आणि प्रत्येक नागरिकास व्यक्तीशः भेटून आरोग्य शिक्षण देण्यात येणार आहे.घरातील सर्व सदस्यांना व्यक्तिशः प्रि-कोविड, कोविड आणि पोस्ट-कोविड परिस्थितीनुसार आरोग्य संदेश समजावून सांगण्यात येणार आहे.१५ सप्टेंबर ते २५ ऑक्टोबर दरम्यान ही मोहीम राबविण्यात येणार आहे. कोविड नियंत्रण आणि मृत्यूदर कमी करण्यासाठी ही मोहीम प्रभावीपणे राबवण्याची गरज आहे. या मोहीमेसाठी दहा आरोग्यपथके नेमण्यात येत आहेत.आणि प्रत्येक पथक दररोज ५० घरांना भेट देणार आहेत. घरातील सदस्यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार असून एखाद्या व्यक्तीमध्ये ताप,खोकला,दम लागणे,ऑक्सिजनची कमतरता असणे अशी कोविडसदृश लक्षणे आढळल्यास त्याची फिवर क्लिनिकमध्ये कोरोना चाचणी करून पुढील उपचार करण्यात येणार आहेत.५ ते १० पथकांमागे १ डॉक्टर सेवा देणार आहे.यासाठी आरोग्य विभाग तसेच ग्रामपंचायत,लोकप्रतिनिधी यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे.त्यादृष्टीने ग्रामपंचायत स्तरावर टेम्परेचर गन,आँक्सिमिटर,मास्क सॅनिटायझर आदी वस्तू आवश्यक त्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तरी राज्य शासनाच्या या मोहिमेत सर्वांनी सक्रिय सहभागी होऊन कोरोना विरुद्धच्या लढ्याला बळ द्यावे असे आवाहन त्यांनी शेवटी केले आहे.
यावेळी ग्रामविकास अधिकारी नारायण खेडकर यांनी शासनाच्या मोहिमे विषयी मार्गदर्शन करताना या मोहिमेचा उद्देश,व्याप्ती,कार्य याबाबत माहिती दिली. यावेळी आरोग्य सेविका तरुळे वि.एल.समुदाय अधिकारी प्रकाश पतंगे,विकास जाधव,ग्रामसेवक,ग्रामपंचायत सदस्य सविता लोंढे,व आरोग्य सेविका व आशा कर्मचारी उपस्थित होते.
Leave a Reply