संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
संकरीत गोपैदास वाढविण्यासाठी विकसीत केलेल्या व अमेरिकेमधून आयात झालेल्या सॉर्टेड सीमेनचा ( सुधारित वीर्य ) उपक्रम राबविण्याचा देशात पहिला मान गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध संघास मिळाल्यानंतर सन २०१९ २० या एका वर्षात बायफ संस्थेच्या सहकार्याने सुमारे ५१ हजार ६५ कृत्रिम रेतनाचा उपक्रम राबवून गोदावरी दूध संघाने अहमदनगर जिल्ह्यात नवा उच्चांक प्रस्तापित केला असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
कृत्रिम रेतन ही पाळीव प्राण्यांसाठी, बहुत करून दुधाळू जनावरांच्या, कृत्रिम गर्भधारणेसाठी वापरण्यात येणारी एक पद्धत आहे. या पद्धतीमध्ये वळूचे अथवा रेड्याचे (नर पशू) वीर्य (रेतन) संकलन करून ते योग्य प्रक्रिया करून साठविले जाते.नंतर त्याद्वारे गाय, म्हैस, अशाप्रकारच्या दुधाळू जनावरांचे ‘फलन’ केल्या जाते.या रितीच्या वापरण्याने, चांगल्या दर्जाची पशूसंतती निर्माण होते व पशूपालनात आणि पशूंवर आधारित व्यवसाय करणाऱ्यांना ते आर्थिकदृष्ट्या फायद्याचे ठरते.
गोदावरी दूध संघ व बायफ विकास संशोधन प्रतिष्ठान,उरळीकांचन यांच्या संयुक्त विद्यमाने जातीवंत होस्टीन व जर्सी वळुच्या सिमेन वापरातून दैनंदिन २५ लिटरहून अधिक दूध देणाऱ्या हजारो गाई गोदावरी दूध संघाच्या कार्यक्षेत्रात निर्माण झाल्या आहेत.कार्यक्षेत्रातील कोपरगांव,राहाता,येवला,वैजापूर,सिन्नर आदी तालुक्यांतील एकूण ३४ पशुधन विकास केंद्रांमार्फत २०१९-२० या एका वर्षामध्ये ५१ हजार ६५ गाईंना कृत्रिम रेतन केले गेले असून या कालावधीमध्ये सुमारे ९ हजार ८८६ कालवडी जन्मास आलेल्या आहेत.या सिमेनचे गर्भधारनेचे प्रमाण सरासरी ५० टक्क्याहून अधिक आलेले आहे.कालवडींपेक्षा गोयांचा जन्मदर अतिशय कमी आहे.चालू वर्षात एप्रिल ते जून या कोरोना संक्रमनाच्या तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये ११ हजार ६२० गाईंना कृत्रिम रेतन केले गेले आहे.
ऑक्टोंबर २०१६ पासून हा महत्वाकांक्षी उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतल्यानंतर ९० टक्के कालवडींच्या जन्माची हमी असणारे लिंगनिश्चित वीर्य ( सॉर्टेड सिमेन ) वापरास सुरुवात झालेली आहे.सध्या गोदावरी दूध संघ पुरस्कृत पशुधन केंद्रांवर हे सॉर्टेड सिमेन उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे.याचा दूध उत्पादन वाढीसाठी मोठा लाभ झालेला आहे.या पारंपारिक सॉर्टेड सिमेनसोबतच बायफने देशी गोवंशाचे खिलार,गीर,साहिवाल तसेच म्हसीचे व शेळ्यांचे ( उस्मानाबादी, संगमनेरी, बिट्टल) सिमेन उपलब्ध करुन दिलेले आहे.संघाच्या कार्यक्षेत्रात गेल्या दोन वर्षापासून पशुरोग निदान प्रयोगशाळा कार्यरत असून माफक दरामध्ये पशु चिकित्सा करण्यात येते.रक्त,लघवी,शेण,दूध यांची तपासणी करुन त्यातून येणाऱ्या अहवालानुसार कार्यक्षेत्रातील पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना योग्य उपचार करणे शक्य व सुलभ झालेले आहे.या सर्व उपक्रमामुळे संघाच्या कार्यक्षेत्रातील पशुधन व दूध उत्पादन वाढण्यास चांगली मदत झालेली असल्याचेही संघाचे अध्यक्ष परजणे यांनी सांगितले आहे.
या उपक्रमासाठी बायफ संस्थेचे क्षेत्रिय कार्यक्रम समन्वयक व्ही.बी.दयासा,कार्यक्रम समन्वयक सुधीर वागळे,गोदावरी दूध संघाचे कार्यकारी संचालक चंद्रकांत गाढवे,राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डचे प्रकल्प समन्वयक डॉ.चंद्रकांत धंदर,बायफच्या वरिष्ठ अधिकारी कु.नीधी परमार,वरिष्ठ प्रकल्प अधिकारी डॉ. बाळासाहेब जिगळेकर यांच्यासह कृत्रिम रेतन तज्ज्ञांचे सहकार्य लाभले आहे.
Leave a Reply