संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव नगरपरिषद व तालुक्यातील सर्व अधिकाऱ्यांनी कोरोनाकाळात आपल्या जीवाची बाजी लावून आपल्याला सुरक्षित ठेवल्यानेच आज कोपरगाव शहर कोरोना मुक्त आहे आपण चांगल्या सवयी आत्मसात केल्या तर आगामी काळही सुरक्षित व आरोग्यदायी राहील असे प्रतिपादन कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी नुकतेच एका प्रसिद्धी पत्रकान्वये काढले आहे.
दरम्यान या वर्षी नागरिकांनी व विविध गणेश मंडळांनी सध्याचा कालखंड कोरोना साथीमुळे कठीण असल्याने व संसर्ग पसरण्याचा धोका असल्याने साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी केले आहे.
जगभरासह कोरोना विषाणूने भारतातही कहर उडवून दिला आहे.आज देशभरात ३ हजार ९८४ रुग्णांची वाढ होऊन एकूण ९ लाख ११ हजार ६२९ रुग्णांना या विषाणूची बाधा झाली आहे.तर २३ हजार ७८८ नागरिकांचा बळी गेला आहे.राज्यात २ लाख ६० हजार ९२४ रुग्णाना या विषाणूची बाधा झाली असून १० हजार ४८२ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.तर नगर जिल्ह्यात आज अखेर ८९४ जणांना लागण होऊन २२ जनांचा बळी गेला आहे.कोपरगाव शहरात सुरुवातीस एक लाक्षीनागरच्या महिलेच्या बळीचा अपवाद वगळता अन्य एकही नागरिकास तोशीस लागलेली नाही.नजीकच्या तालुक्यात व जिल्ह्यात किती भयावह स्थिती आहे हि बाब सर्वांना ज्ञात आहे.या पार्श्वभूमीवर कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी हे प्रसिद्धीपत्रक प्रसिद्धीस दिले आहे.
त्यात त्यांनी पुढे म्हटले आहे की,”महाराष्ट्रातील नगरपरिषदा असलेल्या शहरात फक्त एकमेव “कोपरगाव” शहरच आज कोरोनामुक्त आहे.कोपरगाव शहर व तालुक्यातील जनतेने प्रशासनास चांगले सहकार्य केल्यामुळेच आपण सर्वजण सुरक्षित आहोत. संपुर्ण प्रशासकिय यंत्रणा-अधिकारी-कर्मचारी हे आजही रात्रंदिवस कार्यरत असल्यानेच हे शक्य झाले आहे.अनेक नागरिकांना मुखपट्टी नाही म्हणून व सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याबद्दल नाईलाजाने दंड करावा लागला आहे.सर्वांचे जीविताच्या संरक्षणासाठीच नगरपरिषद-पोलीस व तहसील प्रशासनाला काही कठोर पावले उचलावी लागतात.नागरिक सुरक्षित रहावेत हाच आमचा हेतू आहे.येथून पुढेही सर्वांनी सहकार्य-समन्वय ठेवणे गरजेचे आहे.कुणालाही दंड भरावा लागणार नाही अशा पध्दतीने सर्वांनी नियम-कायदे पाळणे बंधनकारक आहे.येणारा गणेशोत्सवही आपण सर्वांनी सहकार्य करून “एक गाव, एक गणपती “असा निर्णय घेऊन साजरा करणे अत्यंत महत्वाचे ठरणार आहे.त्यामुळे प्रशासकिय यंत्रणेवरचा ताण कमी होऊन कोरोनाचा धोकाही कमी होणार आहे.नुकत्याच संपन्न झालेल्या गणेश मंडळांच्या बैठकीमध्ये “एक गाव एक गणपती” असावा असे मत अनेकांनी मांडले.आजी माजी आमदार,मंडळांचे सर्वपक्षीय प्रतिनिधी,अधिकारी यांचे याविषयी एकमत असल्याने हा आदर्श उपक्रम राबवून कोपरगाव शहराचा लौकिक आपण वाढवू शकतो यात कुठलीही शंका नाही.
केवळ धार्मिक भावनांचा विचार न करता सर्व नागरिकांच्या जीविताचाही आपण सर्वजण विचार केला पाहिजे.कोरोनाचा शिरकाव झाल्याने अनेक ठिकाणी पुन्हा ८ ते १५ दिवसांची टाळेबंदी करण्याची वेळ आली आहे.कोपरगाववर अशी वेळ येऊन पुन्हा व्यवसाय-कामधंदे बंद होऊन जनतेचे हाल होऊ नयेत यासाठी सर्वांची सावध राहायला हवे असे आवाहनही अध्यक्ष वहाडणे यांनी शेवटी केले आहे.
Leave a Reply