संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील गोधेगावसारख्या ग्रामीण भागातून आलेल्या तरुण तन्मय विठ्ठल रांधवणे याने अभ्यास आणि परिश्रमाच्या जोरावर वयाच्या २६ व्या वर्षी पी.एच.डी.मिळवली आहे.त्याच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
तन्मय रांधवणे वर्तमानात अमेरिका स्थित मायक्रोसॉफ्ट कंपनीत कार्यरत आहे.आतापर्यंत त्यांचे विविध संशोधन नियतकालिकात शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत.तसेच स्पेन, चीन येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात संशोधन कार्याचा सन्मान करण्यात आला. “पादचाऱ्यांची सामाजिक धारणा आणि व्हर्च्युअल साधनांच्या उपयोजनातून मानव-रोबोट संवादाचा अभ्यास” हा त्यांच्या पी.एच.डी. संशोधनाचा विषय होता. यासाठी प्रोफेसर.डॉ. दिनेश मनोचा यांचे मार्गदर्शन लाभले होते.
तम्नय रांधवणे यांने हुपरी येथील जिल्हा परिषद शाळेतून प्राथमिक शिक्षण पूर्ण केले.त्यानंतर कोपरगाव येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातून माध्यमिक शिक्षण घेतले.आय.आय.टी. प्रवेशासाठीची पात्रता परीक्षा जेईई देशात दहाव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला होता. मुलभूत संशोधनाची आवड असलेला तन्मय यांनी देशातील प्रतिष्ठित आय.आय.टी. मुंबई येथून संगणकशास्त्रात बी. टेक. पदवी पूर्ण केली.अमेरिकेतील सर्वोत्तम संगणक ग्राफिक्स विभाग असलेल्या नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला आणि तेथून काठिण्य पातळी अधिक असलेला पी.एचडीचा अभ्यासक्रम वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी यशस्वीरित्या पूर्ण केला आहे.
तन्मय हे रयत शिक्षण संस्थेत कार्यरत प्रा. विठ्ठल रांधवणे आणि प्रा.डॉ. प्रतिभा रांधवणे यांचे सुपुत्र आहेत. मुलभूत संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या समन्वयातून सामान्य माणसांचे जीवन सुलभ करण्याचा मानस असल्याचे तन्मय यांनी सांगितले. अभ्यास आणि सातत्याच्या जोरावर गोधेगाव ते अमेरिका हा तन्मय यांचा प्रवास ग्रामीण भागातील तरुणांना प्रेरणादायी ठरणार असल्याची भावना गोधेगाव ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. आपल्या कर्तृत्वान पुत्राच्या यशाबाबत गोधेगाव ग्रामस्थानी समाधान व्यक्त केले आहे.
Leave a Reply