जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव अद्याप ओसरलेला नसून शहरी भागांपेक्षा ग्रामीण परिसरात रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.भविष्यातले हे संकट लक्षात घेवून गांवोगावच्या नेते मंडळींनी राजकीय हेवेदावे बाजुला सारुन येत्या १५ जानेवारी रोजी होणाऱ्या सर्वच ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध करुन एक नवा आदर्श निर्माण करावा असे आवाहन जिल्हा परिषदेचे सदस्य राजेश परजणे यांनी नुकतेच केले आहे.
सद्याच्या कोरोना महामारीच्या गंभिर परिस्थितीतून आपल्या सर्वांची वाटचाल सुरु असताना अशा काळात ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेतल्यास भविष्यात ही बाब अधिक अडचणीची ठरु शकते-परजणे
परजणे यांनी यासंदर्भात एक पत्रक प्रसिध्दीस दिले असून त्यात नमूद केले आहे की,”कोपरगांव तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींसह जिल्ह्यातील सुमारे ७६७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका येत्या १५ जानेवारी रोजी होत आहेत. सद्याच्या कोरोना महामारीच्या गंभिर परिस्थितीतून आपल्या सर्वांची वाटचाल सुरु असताना अशा काळात ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेतल्यास भविष्यात ही बाब अधिक अडचणीची ठरु शकते. निवडणुकीच्या प्रचारासाठी उमेदवारांचे प्रत्येक मतदारांच्या घरोघरी जाऊन भेटी घेणे, मतदारांबरोबर हस्तांदोलन करणे, कार्यकर्त्यांची एकत्रित गर्दी होणे, ठिकठिकाणी बैठका, कॉर्नर सभा आयोजित करणे अशा अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून ग्रामस्थ व कार्यकर्ते एकत्र येण्यामुळे कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव फैलावण्याची दाट शक्यता आहे.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाने घालवून दिलेल्या आदर्श नियमांचे व तत्वांचे पालन प्रत्येकाकडून होईलच याची सुतराम शक्यता नाही. त्यातच शहरांपेक्षा ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण अधिक प्रमाणात आढळून येत असल्याने निवडणुकीच्या धामधुमीत रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढू शकते. गांवपातळीवर नेते मंडळींचे राजकीय तसेच वैयक्तीक स्वरुपाचे वाद सर्वश्रुत आहेत.निवडणुका लागल्या की या वादाला अधिक धार चढते, निवडणुकीतील चुरस व स्पर्धेमुळे परस्परांमध्ये मोठे वाद निर्माण होवून कटुता वाढते. निवडणुका दोन दिवसात पार पडतात परंतु गावागांवातील आणि घराघरातील वाद मात्र कमी होण्याऐवजी वाढत जातात. गांवात ताणतणाव आणि अराजकता निर्माण होते. निवडणुका झाल्यानंतर शासकीय लाभाच्या योजना राबविताना विरोधकांमुळे अनेक अडचणी निर्माण होतात. सदस्यांच्या कमी, अधिक संख्येमुळे ग्रामपंचायतीचे ठराव मंजूर होण्यास अडथळे येतात. अनेक योजना तशाच प्रलंबित राहतात, परिणामी गांव विकासापासून वंचित राहते. या सगळ्या बाबींचा गांवातील पुढाऱ्यांनी विचार करुन व एकत्रित बैठका घेवून निवडणुकांचा प्रश्न सामोपचाराने निकाली काढावा. गांवाच्या विकासासाठी राजकीय हेवेदावे बाजुला सारुन
ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध केल्यास एक चांगला पायंडा पडून नवीन आदर्श निर्माण करता येवू शकतो. याशिवाय निवडणुकांसाठी शासनाचा आणि उमेदवारांचा होणारा लाखो रुपयांचा अवाढव्य खर्चही वाचू शकतो. अशा खर्चामधून गांवात काही विधायक स्वरुपाची कामे मार्गी लागण्यास हातभार लागू शकतो असे सांगून श्री परजणे पाटील यांनी या सगळ्या ताणतणावामध्ये
कोरोना संसर्गाची भीती मात्र कायम असल्याने भविष्यातील गंभिर परिस्थिती विचारात घेवून जिल्हाभरातील गावोगांवच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येवून येत्या १५ जानेवारी रोजी होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध कराव्यात असे आवाहन शेवटी केले आहे.
Leave a Reply